Wednesday, May 9, 2012

माती आणि माणस..... अरुणा ढेरे


माती आणि माणस
अरुणा ढेरे

पुस्तकाच्या नावावरूनच त्याचा बोध होतो. जशी माती तशी माणस.
माती पाहिला गेले तर स्थुलरुपी सगळीकडे एकच आहे. पण तिचा रंग, तिचा पोत, तिची पाणी धारण करण्याची क्षमता ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात जेव्हा तिच्यातून उगवायच असत.
परमेश्वरानेही सगळ्याना एकाच मातीतून उगवल पण प्रत्येकाची पोट हा निराळाच. अशाच निराळ्या आणि विरळ्या महान लोकांचे अनुभव ह्या छोट्याश्या पुस्तिकेत आहेत. अगदी अवघ्या एक दीड पानांचे हे अनुभव अयुष्यभराची शिदोरी देऊन जातात. एक जरी अंगिकारता आला तरी ह्या जन्माचे भाग्य.

गाव झुला



काही पुस्तके अशी असतात की ती वेड लावतात, पलटणा-या पानाबरोबर आपलेही विचारचक्र फिरत रहाते."गाव झुला" हे अशा पुस्तकापैकीच एक आहे. ४३ लघु ललीतांना सांधून बनणारा एक दीर्घ ललित.

पुस्तकाचे मुखपृष्ठ , मातीवर उपडी पडलेली भिक्षेची खापरी आणि काठी जणू निर्मोहाचे प्रतीकच ! मलपृष्ठावरील म.. देशपांड्यांची कविता ह्या पुस्तकाचे जणू सारच !!

एका बैराग्याचा प्रवास, जो शोधाला निघाला आहे. कोणाच्या ? कशाला? आणि का ? अशांसारखे अनेक प्रश्नाचे गाठोडे घेउन. आईने आळवलेली गाणी स्मरणी ठेवून, वळण वाटान्वर पुढेच जायचा ध्यास घेऊन चालतोय.

अनेक प्रश्न सदोदित मनात रुंजी घालतात, पावले थबकतात, मागे वळण्याची इच्छा होते. शैशव राखतो तो शिष्य. शैशवातले निरागस प्रश्न संपले की शिष्यत्वही संपतं. हे गुरुचे शब्द  त्याना वंद्य मानून गुरूची आज्ञा न मोडता पुढच्या अविरत प्रवासाला निघतो. त्याच्या प्रवासाबरोबर आपणही हा नवखा प्रवास करतो. त्याच्या प्रश्नांत आपणही गुंततो, तो गुंता आपलाच बनतो. त्याच्या शोधाबारोबर आपण आपलाही शोध घेऊ लागतो.

पुस्तकाची लेखणी खिळवून ठेवणारी आहे.एकदा हातात पडल्यावर ,एकादमात वाचून टाकण्यासारखे हे पुस्तक नक्कीच नाही आहे. हे मुळी पुस्तकच नाही आहे - हे एक "चिंतन" आहे. जे परत परत होत रहाते. विचारांचे मंथन करत रहाते.

भाषा साधी आहे, कधी सरळ तर कधी वळणा वळणाची, पण मनापर्यंत पोहचणारी. त्यातले विचार मनात कोरून ठेवणारी. साधी साधी रूपके , ओळी परत परत वाचायला भाग पाडतात , जसे " मूळ बुंध्याशी पडलेली सावली धरून झाडं स्तब्ध उभं होत . किंवा , "आई कळायला अन् गुरू अनुभवायला मोग-याचं काळीज लागतं.’

या प्रवासात मोहाला थारा नाही. त्यावर मात करायला तो निघाला आहे पण कशी कार्याची हे त्याला अनुभवातून आत्मसाद करायचे आहे. म्हणूनच ,"वाटेत मन लावायचं नाही अन वळणापाशी अडखळायचे नाही " अशी गुरुची आज्ञामानून अविरत प्रवास सुरू ठेवतो.

प्रश्नाना घाबरले नाही तर त्यांची उत्तरेही आपसूकच मिळतात ह्याची त्याला अनुभूति प्रवासात होते. म्हणूनच लेखक सहजगत्या लिहून जातो, "तो कधी कुठे अडखळला नाही. अनेक गावं , राने वने पार करणा-या प्रवाशाच्या पावलांनी वाटा घडू लागल्या . घनदाट जंगलातही स्वयंभू वाटा असतात . जाणत्या पावलांनाच त्या सापडतात .त्यासाठी पावले मात्र तयार हवीत. गवताचं पातंही दुखावलं तर हळहळणारी अन काट्यांनी दुखावलं तरीही ओरड न करणारी पावलं असली की जंगलातल्या वाटा सापडतात".

दु:खदायी घटना ह्या क्लेशदायी असतातच तरी सुखदायक घटना ह्या मोहात गुंतवून ठेवून अधिक वेदनादायक ठरतात. ओरखडे जसे दुखावतात; मखमली स्पर्श देखील वेदानादायीच असतो. सवय लावतो आणि बांधून ठेवतो . दु:खाचे काढ आणि सुखाची गुंगी दोन्हीही सवयीचा भाग बनतात . घर करतात. त्याच्यासाठी घरे तुटतात देखील . मग घर घडवायचाच कशाला ? कशाला घालायचा हा घाट? हा प्रश्न त्याच्या मनात डोकावतो पण त्याच्याशीही तो सलगी करत नाही आणि मार्गस्थ होतो . त्याला कशाचाच मोह पडत नाही , अगदी भूकेचाही नाही . कोणी जोंधळा देऊ केला तर तो पाखराना देऊन निमूट आपली वाट चालत रहातो . त्या जोंधळ्याचे ओझ त्याला पेलवत नाही आणि ओझ्यामागे चाल राहाणे हे त्याचे प्राक्तन नाही .म्हणूनच ह्या बैराग्याचे सारे काही अप्रूप आहे तो आपला सदोदित चालत रहातो .

या पुस्तकात जागोजागी पुराणातल्या कथा रूपकात्मक पेरल्या आहेत. सरळ सरळ व्यक्तीचा वा पात्राचा उल्लेख ना करता अपरोक्ष रीत्या मूळ उद्देश वाचकापर्यंत पोहचवण्याची धडपड दिसून येते.

बैराग्याच्या कल्पनाच निराळ्या , कधी तो वेड्यासारखा धावत सुटतो . का तर? मोहापासून दूर जाण्यासाठी.
तर कधी वाटेत पडणारे गाव निर्मल, लख्ख करतो. कारण गाव हा त्याचा जिव्हाळ्याचा. गाव जर स्वच्छ तर मनही स्वच्छ यावर त्याचा गाढ विश्वास.

श्रद्धा - अंधश्रद्धा ह्यांचे भयानक जीवघेणे प्रकार तो उघड्या डोळ्यांनी पहातो आणि त्याची खात्री पटते 'जमिनीवर पाय नव्हे, हात हवेत. कर्तृत्व क्षयग्रस्त झालं की मग चमत्काराची अपेक्षा केली जाते. ज्याचे हात जमिनीवर असतात, त्याचं कर्तृत्वही बुलंद असतं.’

सुरुवातीला गुरुभेट घेऊन निघालेला बैरागी , अनेक वेळा गुरूला अप्रत्यक्षरीत्या अनुभवतो , कधी त्याच्याच विचारातून तर कधी नकळत भेटलेल्या वाटसरूत, नदी नाल्या ओढ्यातून तर कधी सरपटणा-या वा उडणा-या जीवातून.

काही ठिकाणी लेखाकाचा पूर्वग्रह त्याच्या लिखाणावर मात करत आहे हे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे वाचताना काहीवेळा निराशाही पदरी पडते.

लेखक विदर्भातील असल्यामुळे वैदर्भीय भाषेची पखरण करून अनेक नव्या शब्दांची ओळख होते.

हे पुस्तक एक दीर्घ ललित बंध असल्यामुळे तसेच लोकप्रभा सापताहीकातून हे लेख पूर्वप्रसिद्ध झाल्यामुळे
काही ठिकाणी तोच तोच पणा आला आहे , तरी तो कन्टाळवाणा वाटत नाही तर तो पुढच्या प्रवासाला पूरक असाच ठरतो.

गावझुला [दीर्घ ललितबंध]लेखक : श्याम पेठकर
विजय प्रकाशन, नागपूर.प्रथमावृत्ती १७-१०-२००९
किंमत :- २५० रुपये.




मुक्ता पाठक शर्मा