Sunday, February 16, 2014

तेरूओ आणि काही दूरपर्यंत………...गौरी देशपांडे

तेरुओ आणि काही दूरपर्यंत , या दोन लघु कादंबर्या आहेत गौरी देशपांडेंच्या . 
मुळातच गौरी देशपांडेंच्या प्रत्येक कथेची सूत्रधार म्हणा वा मुख्य पात्र म्हणा ही कायम एक स्त्रीच असते. 
विविधतेने नटलेली स्त्री पात्रे तीही परिस्थितीनुरूप स्व:ताला सक्षम करणारी वा दाखवणारी वा …। 
रुढीना तोडून वा डावलून जीवन जगणारी नायिका नेहमीच खास असते. तिच्या जगण्याचे मूल्य वेगळेच. ती कधी आपलीशी वाटते, कधी तिच्यातच प्रतिबिंब दिसते , कधी तिचा हेवा वाटतो कधी थोडी नाराजीही. पण इतके होऊनही तिचा साथ सोडावासा वाटत नाही. 
तेरुआ आणि काही दूरपर्यंत ह्या दोन्ही कथा आपापला साज घेऊन आलेल्या, वेगळ्या घाटणीच्या. शब्दांमध्ये अडकलात तर कधी न कळणार्या. पण सावध राहून एखाद्या  शब्दाला पकडता म्हणण्यापेक्षा उमजता आले तर त्या गवसलेल्या. 
दोन्ही लघु कादंब-या १९९० च्या दशकातल्या तरी आजच्याच वाटणा-यां हेच सदाबहार यश म्हणावे लागेल लेखिकेचे ! 

तेरुआ 
या कथेची सुरुवातच सर्व साधारण कल्पनेहून वेगळी. कथेच्या नायिकेला नाव नाही आणि त्याची गरजच भासत नाही. 
"कुठल्याही घडलेल्या घटना,मनात आलेले विचार, पडलेली स्वप्न , केलेली मनोराज्य असं काही सांगायचं म्हंटलं  की त्यांना  बांधणारी एक काळाची चौकात तयार होते; तसं  काही विशेष कारण नसताना त्याना एक सुस्त्रता येते; एक आधी घडलं , तर एक मागाहून, असा क्रम निर्माण होतो; गोष्टी जिथे घडल्या त्या ठिकाणांच वैशिष्ट्य त्याच्यात उतरतं;आणि तशातच व्यक्तींना नावं  व रंगरूप दिल की सांगणा-याच्या मनात असते त्याहून निराळीच आकृती ऐकणा-याच्या डोळ्यासमोर उभी राहते . " 
असे सुरुवातीलाच स्पष्ट करून नायिका "मी" म्हणून समोर येते. आणि मग आपणही मी म्हणूनच कथेबरोबर समोर वाहत जातो. 
तिची डायरी म्हणावी तर त्यात वर्ष तारीख काहीच नाही …. फक्त जपान मध्ये घालवलेले तिचे महिने. तेही एक वर्षाचा शेवट होऊन नव्या वर्षाकडे आगेकूच करणा-या डिसेंबर महिन्याने … मग त्या पाठेपाठ येणारी पत्रे कधी ती"तेरुआ" नाहीतर कधी  "जी" ना लिहिलेली. जी ना लिहिलेली पत्रे त्यांच्या  पर्यंत पोहोचलीच असावीत पण तेरुआला लिहिलेली पत्रे त्याला पाठवली असावीत का हा प्रश्न मनात रहातोच. 
"मी" जनक अर्थात नवा-याबरोबर जपान मध्ये आलेली , विविध देश फिरून त्यांचा अनुभाव म्हणण्यापेक्षा आस्वाद घेऊन आलेली. 
ती स्वछंदी  नाही आहे पण एखादी गोष्ट आवडली तर त्यावर निस्सीम प्रेम करणारी , भक्ती करणारी …. पण त्यात अडकून वा गुंतून न पडणारी . असं  खरच जगता येत का? कदाचित येत असाव , जेव्हा सभोवतालची आवरणं  बाजूला सारून , जे आवडत ते मान्य करण्याच धाडस वा कबुली ते ही स्व:ताशी देता आली तेव्हा असं  नक्कीच जगता येत असावं . 
जनक आणि तिच्यात  नुसता बंध आहे नात्याचा , आधी केलेल्या प्रेमाचा आणि आताही ती करत असलेल्या  unconditional प्रेमाचा (?) . 
जपान मध्ये आल्यावर तिला या अनोख्या देशातील अनोख्या लोकांचा त्यांच्या लोकमान्य प्रथित रिवाजांचे नावलाही वाटते. कधी हिंदुस्थानाला रूढीवादी म्हणणारी क्षणभर जपानी लोकांच्या वागण्यामुळे चकीत होते. पण ती अशा गोष्टीत अडकत नाही . म्हणूनच ती प्रथामादार्शीच तेरुआच्या प्रेमात पडते …। तिचे हे प्रेमात पडणे अल्लड  वयातले नाही तर चक्क चाळीशीच्या आसपास पोहचल्यावर जडलेले प्रेम ते ही पहिले वाहिले नाही .  ती ते तेरुआपासून लपवूनही ठेवत नाही


Monday, April 1, 2013

"झिम्मा आठवणींचा गोफ......" विजया मेहता

"झिम्मा आठवणींचा गोफ......"





मराठी माणसाचे आणि रंगभूमीचे एक आगळेवेगळे नाते आहे. नाटकांची आवड नसलेला मराठी माणूस विरळाच !



नुकताच मराठी नाटकान्च्या विश्वात प्रायोगिक नाटकान्ची एक अनोखी सुरूवात करणा-या विजया मेहतांचा ७५ वा वाढदिवस साजरा झाला. त्या मुहूर्तावर त्यांच्या "झिम्मा आठवणींचा गोफ......" आत्मचरित्राचे नुकतेच ४ नोव्हेंबरला प्रकाशन झाले. हे आत्मचरित्रापेक्षा नाट्यविश्वात एकरूप झालेल्या विजयाबाईचे स्व-कथन आहे. प्रायोगिक रंगभूमी कडून व्यावसायिक रंगभूमी कडे झालेला प्रवास ज्यात अविरत नाट्यवेड्या विजयाबाईची अभ्यासू वृत्ती द्र्ष्टीस येते.

एखादे पुस्तक हातात पडले की आपसूकच त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ, मागील पृष्ठ न्याहाळले जाते मग हळूच आतल्या पानावरच्या मजकूरांवर नजर फिरते, समर्पण पत्रिकेवर डोळे काही वेळ घोटाळतात आणि मग प्रस्तावनेची पाने पालटली जातात. ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नजर स्थिरावते ती रंगायनाच्या काळ्या पदद्या समोर विविध मुद्रांच्या विजयाबाईना न्याहाळण्यासाठी ज्याची रचना सुभाष अवचट यांनी केली आहे. झिम्मा ही अक्षरेही एका गॉफात विअणल्या सारखी सुंदर. रंगायनाचा काळ पडदा म्हणजे अवकाशाची पोकळी आणि त्या पोकळीत जन्माला आलेले अनेक नाट्याविष्कार जे वर्षानुवर्ष रसिक प्रेक्षकान्च्या मनाला भूरळ पाडतील आणि त्यावर राज्य करतील.

मल पृष्ठावर तर विजयबाईन्च्या ह्या आत्मचरित्राचा गौरव, "एका सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा......." असेच केले आहे.

सा-या आठवणी ४४० पानांच्या ३२ प्रकरणान्मध्ये गुंफल्या आहेत.

सुरुवातीलाच त्या प्रांजळपणे सांगतात की लिखाण हा त्यांचा प्रांत नाही.

विजया बाईन्चे लहानपण गोरेगावातील आम्बेवाडीतील चाळीत तर नंतर माटुन्ग्याच्या विद्यार्थी भुवानात गेले. वडीलांचा तसेच भावाचा अकस्मात मृत्यू अशा घटना लागोपाठ घडल्या आणि त्यांच्या स्मृती लहान्या काळजावर कायमचे घर करून राहिल्या. तसा सिनेस्रुष्टीशी निगडीत शोभना समर्थ, नलिनी जयवंत आणि नूतन त्यांच्या नात्यातल्याच त्यामुळे त्यांच्या आईला. सतत धास्ती असायची की हिलाही सिनेमात जायची इच्छा होईल पण त्या राष्ट्रसेवा दलात भरती झाल्या आणि खादी, सेवादलाचे विचार , महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, साने गुरुजी जवाहरलाल नेहरू यानी त्या भारावून गेल्या.

पुढे १९८४ मध्ये मेट्रीक झाल्यावर विल्सन कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यावर "मराठी वाड्मय" मंडाळाच्या कार्यकारी समितीत समावेश आणि तिथूनच कॉलेजच्या वार्षिक संमेलांनात नाटकात सहभागी झाल्या आणि लग्नाची बेडी मधील 'यामिनी' साकारली आणि त्यांच्या नाट्यप्रवासाला इथूनच सुरूवात झाली ती आजगायत सुरुच आहे. एम ए ला असताना शीनोयशी ओळख झाली आणि अल्काझी सारखा नाट्यगुरू लाभला ज्यांच्या कडून त्यानी अभिनय आणि दिग्दर्शनाचे धडे घेतले.

साहित्या संघातल्या नाटकात कामे करायला सुरूवात केली . पहिलेवहीले नाटक "झुंजारराव" आणि 'कमळजेची' भूमिका एक नवे वळण देऊन गेली. तिथेच वसंत ठेन्गडी, राजा परांजपे,के. नारायण, कुसुम देशपाडे आणि दुर्गा खोटे. नाटकात भूमिका आणि दिग्दर्शन करता करता आयुष्याच्या प्रवासातही पुढचे पाऊल टाकले आणि दुर्गा खोटेच्या धाकट्या मुलाशी, हरीनशी विवाहबद्ध होऊन 'विजया जयवंत' विजया खोटे' झाल्या. लग्नानंतर जमेशेटपूरला रवाना झाल्या पण रक्तात भिनलेल्या नाट्यवेडाने तिथेही नाट्यप्रयोग केले. मुम्बईत परत आगमन केले आणि 'रंगायन' चा जन्म झाला.

रंगायन आणि विजयाबाई हा मेळ आणि त्यातून जन्माला आलेली प्रायोगिक नाटके एक वेगळाच पैलू घेऊन रंगमंचावर अवतरली. याच रंगायानाने विजय तेन्डुलकर आणि महेश एलकुंचवार या सारख्या नाटककारांना एक नवी ओळख दिली.

सगळे सुरळीत चालू असताना अचानक हिरेनचा मृत्यू आणि दोन लहानग्या मुलांची जबाबदारी बरोबरच रंगायनाचीही जबाबदारी यामध्ये गोन्धळून गेल्या तरीही नाटकानेच ह्या एकाकी पणाला सोबत दिली आणि 'विजया खोटे' 'विजया मेहता' झाल्या. त्यानंतर लंडनला स्थलान्नतर केले आणि तिथेच अनेक संस्थानमधून तिथल्या रंगभूमीची ओळख जवळून करून घेतली. इकडे एक नवीन प्रवाह गवसात होता तर भारतात रंगायनाला ग्रहण लागले. जेव्हा त्या परत भारतात आल्या तोपर्यन्त बरेच पाणी पुलाखालून गेले होते आणि लवकरच 'रंगायन' आपला आगळा वेगळा ठसा लोकांच्या मनावर ठेऊन रंगमंचावर कायमचा पडदा टाकून गेली. यापुढचा प्रवास व्यावसायिक नाट्याविश्कारातुन होत राहिला आणि अनेक नवे कलाकार आणि नवी नाटके जन्माला आली. त्यांच्यात असलेला प्रायोगिक नाट्य दिग्दर्शक कधीच स्वस्थ बसू शकला नाही, त्यानी एकापेक्ष एक सरस नाटके, भूमिका ह्या रंगमंचावर साकाराल्या विशेष उल्लेखनीय , दुर्गा, सुंदर मी होणार मधील बेबीराजे, मादी मधील नायिका, अजगर आणि गंधर्व मधील वेश्या,संध्या छाया मधील नानी, हमिदाबाईची कोठीमधील हमिदाबाई आणि वाडाचिरेबन्दीमधील आई. विजया बाईनी अनेक कलाकाराना ह्या नाट्य स्रुष्टीत एक नवी ओळख नवे अस्तित्व दिले दिले जसे भक्ती बर्वे, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी आणि नाना पाटेकर. विजया बाईन्चे नाट्य विश्व मराठी पुरतेच संकुचित न रहाता ते हिंदी, जर्मन आणि ईंग्लिश मधेही त्यानी ते विस्तारीत केले.

नाट्यातून त्यानी शाकुन्तल, हवेली बुलंद थी,वाडा चिरेबंदी आणि हमिदाबाईची कोठी यांच्या टेलिफील्म्स केल्या तसेच लाइफ लाईन ही स्मरणीय दूरदर्शन मालिका.

ह्या पुस्तकाबद्दल लिहायचे म्हन्टले तर प्रत्येक अनुभव हा कागदावर जिवंत करणे अशक्यप्राय आहे. ते अनुभवायचे असेल तर नाट्य वेड्या माणसाने नाटकाच्या जन्माची,सृजनाची ही गाथा जरूर वाचावीच. शेवटी मनात विजया बाईन्चे शब्द रुळतात, " नाट्यस्रुष्टीत 'वर्तमान' काळ असतो. प्रत्येक प्रयोग अन् त्यातले प्रसंग, संवाद प्रेक्षकान्च्या साहाय्यान वर्तमानकाळातच घडत असतात. आज आणि आता. चित्रफितीत असतो केवळ 'भूत' काळ. झाल ते होऊन गेले. प्रेक्षक असोत अथवा नसोत चित्रफीत पडद्यावर, टीव्हीवर सुरुच राहाणार. नाटक प्रत्यक्षात घडते अन् संपते. पुन: पुन: घडते अन् पुन: पुन्हा संपते. नाटक घडते तो क्षण म्हणुनच बरेचदा अधिक सत्यस्पर्शी बनू शकतो.



मुक्ता पाठक शर्मा









Wednesday, May 9, 2012

माती आणि माणस..... अरुणा ढेरे


माती आणि माणस
अरुणा ढेरे

पुस्तकाच्या नावावरूनच त्याचा बोध होतो. जशी माती तशी माणस.
माती पाहिला गेले तर स्थुलरुपी सगळीकडे एकच आहे. पण तिचा रंग, तिचा पोत, तिची पाणी धारण करण्याची क्षमता ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात जेव्हा तिच्यातून उगवायच असत.
परमेश्वरानेही सगळ्याना एकाच मातीतून उगवल पण प्रत्येकाची पोट हा निराळाच. अशाच निराळ्या आणि विरळ्या महान लोकांचे अनुभव ह्या छोट्याश्या पुस्तिकेत आहेत. अगदी अवघ्या एक दीड पानांचे हे अनुभव अयुष्यभराची शिदोरी देऊन जातात. एक जरी अंगिकारता आला तरी ह्या जन्माचे भाग्य.

गाव झुला



काही पुस्तके अशी असतात की ती वेड लावतात, पलटणा-या पानाबरोबर आपलेही विचारचक्र फिरत रहाते."गाव झुला" हे अशा पुस्तकापैकीच एक आहे. ४३ लघु ललीतांना सांधून बनणारा एक दीर्घ ललित.

पुस्तकाचे मुखपृष्ठ , मातीवर उपडी पडलेली भिक्षेची खापरी आणि काठी जणू निर्मोहाचे प्रतीकच ! मलपृष्ठावरील म.. देशपांड्यांची कविता ह्या पुस्तकाचे जणू सारच !!

एका बैराग्याचा प्रवास, जो शोधाला निघाला आहे. कोणाच्या ? कशाला? आणि का ? अशांसारखे अनेक प्रश्नाचे गाठोडे घेउन. आईने आळवलेली गाणी स्मरणी ठेवून, वळण वाटान्वर पुढेच जायचा ध्यास घेऊन चालतोय.

अनेक प्रश्न सदोदित मनात रुंजी घालतात, पावले थबकतात, मागे वळण्याची इच्छा होते. शैशव राखतो तो शिष्य. शैशवातले निरागस प्रश्न संपले की शिष्यत्वही संपतं. हे गुरुचे शब्द  त्याना वंद्य मानून गुरूची आज्ञा न मोडता पुढच्या अविरत प्रवासाला निघतो. त्याच्या प्रवासाबरोबर आपणही हा नवखा प्रवास करतो. त्याच्या प्रश्नांत आपणही गुंततो, तो गुंता आपलाच बनतो. त्याच्या शोधाबारोबर आपण आपलाही शोध घेऊ लागतो.

पुस्तकाची लेखणी खिळवून ठेवणारी आहे.एकदा हातात पडल्यावर ,एकादमात वाचून टाकण्यासारखे हे पुस्तक नक्कीच नाही आहे. हे मुळी पुस्तकच नाही आहे - हे एक "चिंतन" आहे. जे परत परत होत रहाते. विचारांचे मंथन करत रहाते.

भाषा साधी आहे, कधी सरळ तर कधी वळणा वळणाची, पण मनापर्यंत पोहचणारी. त्यातले विचार मनात कोरून ठेवणारी. साधी साधी रूपके , ओळी परत परत वाचायला भाग पाडतात , जसे " मूळ बुंध्याशी पडलेली सावली धरून झाडं स्तब्ध उभं होत . किंवा , "आई कळायला अन् गुरू अनुभवायला मोग-याचं काळीज लागतं.’

या प्रवासात मोहाला थारा नाही. त्यावर मात करायला तो निघाला आहे पण कशी कार्याची हे त्याला अनुभवातून आत्मसाद करायचे आहे. म्हणूनच ,"वाटेत मन लावायचं नाही अन वळणापाशी अडखळायचे नाही " अशी गुरुची आज्ञामानून अविरत प्रवास सुरू ठेवतो.

प्रश्नाना घाबरले नाही तर त्यांची उत्तरेही आपसूकच मिळतात ह्याची त्याला अनुभूति प्रवासात होते. म्हणूनच लेखक सहजगत्या लिहून जातो, "तो कधी कुठे अडखळला नाही. अनेक गावं , राने वने पार करणा-या प्रवाशाच्या पावलांनी वाटा घडू लागल्या . घनदाट जंगलातही स्वयंभू वाटा असतात . जाणत्या पावलांनाच त्या सापडतात .त्यासाठी पावले मात्र तयार हवीत. गवताचं पातंही दुखावलं तर हळहळणारी अन काट्यांनी दुखावलं तरीही ओरड न करणारी पावलं असली की जंगलातल्या वाटा सापडतात".

दु:खदायी घटना ह्या क्लेशदायी असतातच तरी सुखदायक घटना ह्या मोहात गुंतवून ठेवून अधिक वेदनादायक ठरतात. ओरखडे जसे दुखावतात; मखमली स्पर्श देखील वेदानादायीच असतो. सवय लावतो आणि बांधून ठेवतो . दु:खाचे काढ आणि सुखाची गुंगी दोन्हीही सवयीचा भाग बनतात . घर करतात. त्याच्यासाठी घरे तुटतात देखील . मग घर घडवायचाच कशाला ? कशाला घालायचा हा घाट? हा प्रश्न त्याच्या मनात डोकावतो पण त्याच्याशीही तो सलगी करत नाही आणि मार्गस्थ होतो . त्याला कशाचाच मोह पडत नाही , अगदी भूकेचाही नाही . कोणी जोंधळा देऊ केला तर तो पाखराना देऊन निमूट आपली वाट चालत रहातो . त्या जोंधळ्याचे ओझ त्याला पेलवत नाही आणि ओझ्यामागे चाल राहाणे हे त्याचे प्राक्तन नाही .म्हणूनच ह्या बैराग्याचे सारे काही अप्रूप आहे तो आपला सदोदित चालत रहातो .

या पुस्तकात जागोजागी पुराणातल्या कथा रूपकात्मक पेरल्या आहेत. सरळ सरळ व्यक्तीचा वा पात्राचा उल्लेख ना करता अपरोक्ष रीत्या मूळ उद्देश वाचकापर्यंत पोहचवण्याची धडपड दिसून येते.

बैराग्याच्या कल्पनाच निराळ्या , कधी तो वेड्यासारखा धावत सुटतो . का तर? मोहापासून दूर जाण्यासाठी.
तर कधी वाटेत पडणारे गाव निर्मल, लख्ख करतो. कारण गाव हा त्याचा जिव्हाळ्याचा. गाव जर स्वच्छ तर मनही स्वच्छ यावर त्याचा गाढ विश्वास.

श्रद्धा - अंधश्रद्धा ह्यांचे भयानक जीवघेणे प्रकार तो उघड्या डोळ्यांनी पहातो आणि त्याची खात्री पटते 'जमिनीवर पाय नव्हे, हात हवेत. कर्तृत्व क्षयग्रस्त झालं की मग चमत्काराची अपेक्षा केली जाते. ज्याचे हात जमिनीवर असतात, त्याचं कर्तृत्वही बुलंद असतं.’

सुरुवातीला गुरुभेट घेऊन निघालेला बैरागी , अनेक वेळा गुरूला अप्रत्यक्षरीत्या अनुभवतो , कधी त्याच्याच विचारातून तर कधी नकळत भेटलेल्या वाटसरूत, नदी नाल्या ओढ्यातून तर कधी सरपटणा-या वा उडणा-या जीवातून.

काही ठिकाणी लेखाकाचा पूर्वग्रह त्याच्या लिखाणावर मात करत आहे हे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे वाचताना काहीवेळा निराशाही पदरी पडते.

लेखक विदर्भातील असल्यामुळे वैदर्भीय भाषेची पखरण करून अनेक नव्या शब्दांची ओळख होते.

हे पुस्तक एक दीर्घ ललित बंध असल्यामुळे तसेच लोकप्रभा सापताहीकातून हे लेख पूर्वप्रसिद्ध झाल्यामुळे
काही ठिकाणी तोच तोच पणा आला आहे , तरी तो कन्टाळवाणा वाटत नाही तर तो पुढच्या प्रवासाला पूरक असाच ठरतो.

गावझुला [दीर्घ ललितबंध]लेखक : श्याम पेठकर
विजय प्रकाशन, नागपूर.प्रथमावृत्ती १७-१०-२००९
किंमत :- २५० रुपये.




मुक्ता पाठक शर्मा

Thursday, April 19, 2012

अज्ञात झ-यावर रात्री.....अरुणा ढेरे

अज्ञात झ-यावर रात्री हे पुस्तक दुस-यांदा वाचले.
पहिले कॉलेज मध्ये असतांना वाचले होते आणि आता परत.
जेव्हा एखादी कलाकृती आपण दुस-यांदा अनुभवतो तेव्हा तिची अनुभूती ही पहिल्या पेक्षा निश्चितच वेगळी असते. ह्या पुस्तकाच्या बाबतीतही हे तंतोतंत लागू होते.
हे पुस्तक म्हणजे १५ पूर्वप्रसिद्ध लघु कथांचा संग्रह.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच अरुणा ढेरे प्रत्येक कथेची पार्श्वभूमी सांगतात. अरुणा ढेरे ह्या आपल्या प्रत्येक लिखाणातून स्त्री ह्या भूमीकेकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहातात. त्यामुळेच कदाचित त्यांचे लिखाण मला कायम आवडते. महाभारतातील स्त्री पात्रांबद्दल असलेली त्यांची ओढ ह्या पुस्तकातील कथांमध्येही दिसून येते. त्याच बरोबर संत स्त्रियांच्या आत्मशोधाचा मागोवा घेणा-या काही कथा समर्थपणे उभ्या रहातात आपल्यासमोर. तर काही लोककथा नव्याने जन्म घेतात.
मनोगतात त्यांनी सहजतेने सांगितले आहे,"एका परीने या संग्रहातल्या कथांमधून नव्या आणि जुन्या स्त्रीचे जगणे मी शोधते आहे. माझ्या जवळची , अनुभव , आणि समाज यांची पुंजी तशी फार मोठी नाही. पण बाल आहे ते तिचेच आहे. वाटते की, अतिदीर्घ आणि अतिविस्तृत असा काल आपल्यापुढे पसरला आहे.आजचे आपण - माणूस म्हणून, बाई म्हणून या काळाच्या हातून काही स्वीकारतो, काही नाकारतो. काही पेटत हाताने शोषतो, काही निर्धाराने गिळून टाकतो. या कथा म्हणजे त्या स्वीकार - नकाराच्या, 
शोषण्या- गिळण्याच्या  आहेत, असे म्हटले तरी चालेल."

पहिली कथा "पूजा" , या कथेची चौकट तंजावरच्या प्रसिद्ध बृहदिश्वर मंदिराशी निगडीत आहे. या मंदिराच्या कळसाची तळी गावातल्या एका वृद्धेच्या  दारातल्या शिलेची घडवलेली आहे. खुद्द बृहदिश्वारानेच नगराधिपती  राजाला स्वप्न दृष्टांताने त्याबाबतची आपली पसंती कळवल्याची स्थळ माहात्म्य कथा या कथेचा आधार आहे.
जयाम्माची सून पद्मा,  नवरा विश्वनाथ १२ वर्षापासून नाहीसा झालेला , कुठे गेला , का गेला याची कोणालाही खबरबात नाही. पद्मा नेमाने आपले कर्तव्य पार करत  एक सवाष्ण असूनही सन्यस्त जीवन जगत आलेली. त्या सन्यस्त जीवनाचे तेज तिच्या चेह-यावर दाटलेले. मनापासून शिवाच्या पूजेत रमून जाणारी जयाम्माची लाडकी सून.
घराच्या दारातली शिला बृहदिश्वाराच्या मंदिराच्या कळसाच्या तळी साठी योग्य ठरल्यापासून जयाम्माचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अखेर शिवाने आपली प्रार्थना ऐकली आणि आपली पूजा सार्थकी लागली असेच तिला मनापासून वाटत होते. शेवटी कोणाची पूजा फळते हे इतक्या सहजतेने कथेत गोवले गेले आहे.

दुसरी कथा : अज्ञात झा-यावर रात्री.  रजू आणि रमा यांची आपली एकेकटीची व्यथा, एकमेकात गुंतून ही कथा समोर येते. १० वर्षानी एकमेकीसमोर समोर येणा-या  मैत्रिणी , वेगवेगळ्या मार्गावर आगेकूच झालेल्या, शेवटी एका वळणावर एकमेकीना भेटलेल्या. इतक्या दूर असूनही दोघीन्च्याही अंतरंगात समजुतीचे झरे झुळकत असणे ही एका अतूट बंधनाची / मैत्रीची ग्वाही देणारे. आणि ग्रेसच्या ओळीच्या गर्भित ओळींचा ओलावा जाणणारे  हे कथानक.कथा वाचल्यावाराही  ओळी मनात गाज देत रहातात 
" मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा ?
अज्ञात झा-यावर रात्री मज ऐकू येतो पावा ...."

तिसरी कथा " की आपुला ठावो न सांडिता "

की आपुला ठावो न सांडिता । आलिंगिजे चंद्रु प्रकटिता ।
ऐसा अनुरागु भोगिता । कुमुदिनी जाणे ।।

शाब्दिक अर्थाच्या  मागे धावताना अर्थ कधीच गवसत नाही. काही अर्थ हे अनुभावान्च्या अनुभूतीतूनच येतात. ह्या कथेचा परीघ असाचा विस्तृत आहे. क्षणभर ह्या कथेचे पात्र अजिता ह्या परीघाची परिसीमा जाणून न घेता आपल्याभोवती परीघाची मर्यादा  रेषा आखते तर जेव्हा सगळ्या गोष्टीन्मागचा अर्थ गवसू लागतो तेव्हा प्रत्येक नातातल्या  परिवर्तनाची उकल तिला होते.ह्या मार्गात वाटाड्या बनतात ते नाना आजोबा.

उमज -- चौथी कथा,

परिस्थिती सगळ काही शिकवते. पण सगळ्या गोष्टी उमजेपर्यंत एका आधाराची आवश्यकता ही लागते.  प्रत्येक झाड हे स्वयंभू वाढत नाही. एका विशिष्ट उंची पर्यंत यायला एखाद्या  झाडाला  आधार लागतो. 
अशीच काही अवस्था सांगणारी ही कथा. जयंत - बिंदा , आणि जयंत - गिरीजा यांच्या नात्याचा ठाव घेते.
जयंत हा आधार आहे तर बिंदा एक स्वयंभू तर गिरीजा आधार शोधणारी. एका वळणावर तिच्या ह्या अवलंबून असण्याच ओझ जयंताला वाटते. त्या ओझ्याला नाकारायाचीही हिम्मत म्हणण्यापेक्षा ,त्याला गिरिजाला दुखवायचे नाही. गिरिजाला जेव्हा स्व:ताच्या कार्यक्षमतेची जाणीव होते तेव्हा तीच स्व:ता हे ओझ हलके करते. 

"धुकं "
पिढीच अंतर , आजी नाती मधल्या नात्याचा सुंदर गोफ.
काळ बदलतो , घड्याळाचे काटे पुढे सरकतात , पिढी मधील अंतरे वाढतात. तरी स्वभावाची चाकोरी कधी बदलत नाही. कपडे बदलावे तसे बाह्य जग बदलते पण अंतरंग , मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म कधीच बदलत नाही.
या कथेत आजी तिच्या नातीला , अर्थात मुक्ता सहजपणे बोलून जाते ," पन्नास वर्ष उशिरा कोय लावली तरी आंबा तो आंबाच उगवायचा  मुक्ते ! "
"जग पुढे न मागे नाही. पन्नास वेळा बदला माती, पण झाड भुईवरच असत ना अन भुईचा बदल म्हणशील तर झाड तेवढा मानून घेत की नाही ? माणसाचाही तसंच असत बाई ! "
आजी   दुसरेपणाची, सासूची नावडती, सासूचे  अनेक अत्याचार सोसलेली तरी शांत . हे सोसण्याच बळ आल कुठून असा कायम प्रश्न पडलेला. आपण जी सारी शक्ती भांडणात वाया घालवतो तीच शक्ती आजीने साठवून ठेवली की काय शांत राहून ?

माती नांगरली , कडकडत उन अन बिलगणा-या पावसाचा प्रेमळ सहवासात तिला मिळाला की तिच्यात बीज चांगल रुजत. तसंच ह्या कथेतल्या आजीच. आजोबांचा प्रेमळ सहवास तिला सा-या दु:स्वासांवर मात करून जायचं बळ देतो. छळणारी सासूही शेवटी तिच्या मायेच्या सावलीत पश्चातापाने जळत - निवत जाते.

तसं पाहिलं गेल तर प्रत्येकाच्याच जीवनात परिस्थितीच धुकं दाटत, पण त्यातून सहारा देणारा वा आपुलकीचा , मायेचा जवळ करणारा स्पर्श सर्व काही सुकर, सुखकर करतो.

कथेच्या शेवटी आजी म्हणते , " माणसाचं आयुष्य असत तरी केवढ ?  एक ओवी गावी अन पैल पालखी जावी ."

सहावी कथा नात.

नंदिता , सुबोध आणि देवकी यांची. प्रेमाचा त्रिकोण.त्यातून उद्भवणारी मानसिक आंदोलने. याचाच घेतलेला  मागोवा. सरळ अपेक्षित वळणाने ही कथा संपते.

"आपण एकमेकांना "

ही कथा मनात घर करून रहाते, लग्न म्हणजे नक्की काय ? दोघांच एकमेकासोबत असण म्हणेजे काय? शरीरापलीकडे  जाऊन एकमेकांची गरज एकमेकांना असते आणि ती गरज शाररीक गरजेपेक्षाही मोठी असते. भावना, मन हे उमजल एकमेकांच तर सगळ आयुष्य सुकर बनत. छोटी मोठी वादळे आली तरी ती निभावून जातात. पण नात्यात हा ओलावाच नसेल तर ते शेवटी विस्कटत आणि तुटत. हेच सांगणारी ही कथा अवि आणि शोभा यांच्या नात्यातली परिणीती.त्याच बरोबर आबा , माई आणि सुमित्राचीही !

कधीतरीची गोष्ट.

"भुललासी   वरलीया रंगा ' असेच काही ह्या कथेतून सुचवायचे आहे.
तेजा , हट्टाने प्रेमविवाह केलेला , आता तिला तिचाच संसार निरस वाटतोय मन दुसरीकडे धावातय  आपण करतोय ते बरोबर आहे की नाही ह्याचही भान नाही , काय कराव काय करतोय ह्या शंकांच्या जंजाळात अडकलेली . दुसरीकडे रेणुका शांत सरळ वाट बघत थांबलेली. 



पानझड......ना. धो. महानोर