Monday, April 1, 2013

"झिम्मा आठवणींचा गोफ......" विजया मेहता

"झिम्मा आठवणींचा गोफ......"





मराठी माणसाचे आणि रंगभूमीचे एक आगळेवेगळे नाते आहे. नाटकांची आवड नसलेला मराठी माणूस विरळाच !



नुकताच मराठी नाटकान्च्या विश्वात प्रायोगिक नाटकान्ची एक अनोखी सुरूवात करणा-या विजया मेहतांचा ७५ वा वाढदिवस साजरा झाला. त्या मुहूर्तावर त्यांच्या "झिम्मा आठवणींचा गोफ......" आत्मचरित्राचे नुकतेच ४ नोव्हेंबरला प्रकाशन झाले. हे आत्मचरित्रापेक्षा नाट्यविश्वात एकरूप झालेल्या विजयाबाईचे स्व-कथन आहे. प्रायोगिक रंगभूमी कडून व्यावसायिक रंगभूमी कडे झालेला प्रवास ज्यात अविरत नाट्यवेड्या विजयाबाईची अभ्यासू वृत्ती द्र्ष्टीस येते.

एखादे पुस्तक हातात पडले की आपसूकच त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ, मागील पृष्ठ न्याहाळले जाते मग हळूच आतल्या पानावरच्या मजकूरांवर नजर फिरते, समर्पण पत्रिकेवर डोळे काही वेळ घोटाळतात आणि मग प्रस्तावनेची पाने पालटली जातात. ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नजर स्थिरावते ती रंगायनाच्या काळ्या पदद्या समोर विविध मुद्रांच्या विजयाबाईना न्याहाळण्यासाठी ज्याची रचना सुभाष अवचट यांनी केली आहे. झिम्मा ही अक्षरेही एका गॉफात विअणल्या सारखी सुंदर. रंगायनाचा काळ पडदा म्हणजे अवकाशाची पोकळी आणि त्या पोकळीत जन्माला आलेले अनेक नाट्याविष्कार जे वर्षानुवर्ष रसिक प्रेक्षकान्च्या मनाला भूरळ पाडतील आणि त्यावर राज्य करतील.

मल पृष्ठावर तर विजयबाईन्च्या ह्या आत्मचरित्राचा गौरव, "एका सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा......." असेच केले आहे.

सा-या आठवणी ४४० पानांच्या ३२ प्रकरणान्मध्ये गुंफल्या आहेत.

सुरुवातीलाच त्या प्रांजळपणे सांगतात की लिखाण हा त्यांचा प्रांत नाही.

विजया बाईन्चे लहानपण गोरेगावातील आम्बेवाडीतील चाळीत तर नंतर माटुन्ग्याच्या विद्यार्थी भुवानात गेले. वडीलांचा तसेच भावाचा अकस्मात मृत्यू अशा घटना लागोपाठ घडल्या आणि त्यांच्या स्मृती लहान्या काळजावर कायमचे घर करून राहिल्या. तसा सिनेस्रुष्टीशी निगडीत शोभना समर्थ, नलिनी जयवंत आणि नूतन त्यांच्या नात्यातल्याच त्यामुळे त्यांच्या आईला. सतत धास्ती असायची की हिलाही सिनेमात जायची इच्छा होईल पण त्या राष्ट्रसेवा दलात भरती झाल्या आणि खादी, सेवादलाचे विचार , महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, साने गुरुजी जवाहरलाल नेहरू यानी त्या भारावून गेल्या.

पुढे १९८४ मध्ये मेट्रीक झाल्यावर विल्सन कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यावर "मराठी वाड्मय" मंडाळाच्या कार्यकारी समितीत समावेश आणि तिथूनच कॉलेजच्या वार्षिक संमेलांनात नाटकात सहभागी झाल्या आणि लग्नाची बेडी मधील 'यामिनी' साकारली आणि त्यांच्या नाट्यप्रवासाला इथूनच सुरूवात झाली ती आजगायत सुरुच आहे. एम ए ला असताना शीनोयशी ओळख झाली आणि अल्काझी सारखा नाट्यगुरू लाभला ज्यांच्या कडून त्यानी अभिनय आणि दिग्दर्शनाचे धडे घेतले.

साहित्या संघातल्या नाटकात कामे करायला सुरूवात केली . पहिलेवहीले नाटक "झुंजारराव" आणि 'कमळजेची' भूमिका एक नवे वळण देऊन गेली. तिथेच वसंत ठेन्गडी, राजा परांजपे,के. नारायण, कुसुम देशपाडे आणि दुर्गा खोटे. नाटकात भूमिका आणि दिग्दर्शन करता करता आयुष्याच्या प्रवासातही पुढचे पाऊल टाकले आणि दुर्गा खोटेच्या धाकट्या मुलाशी, हरीनशी विवाहबद्ध होऊन 'विजया जयवंत' विजया खोटे' झाल्या. लग्नानंतर जमेशेटपूरला रवाना झाल्या पण रक्तात भिनलेल्या नाट्यवेडाने तिथेही नाट्यप्रयोग केले. मुम्बईत परत आगमन केले आणि 'रंगायन' चा जन्म झाला.

रंगायन आणि विजयाबाई हा मेळ आणि त्यातून जन्माला आलेली प्रायोगिक नाटके एक वेगळाच पैलू घेऊन रंगमंचावर अवतरली. याच रंगायानाने विजय तेन्डुलकर आणि महेश एलकुंचवार या सारख्या नाटककारांना एक नवी ओळख दिली.

सगळे सुरळीत चालू असताना अचानक हिरेनचा मृत्यू आणि दोन लहानग्या मुलांची जबाबदारी बरोबरच रंगायनाचीही जबाबदारी यामध्ये गोन्धळून गेल्या तरीही नाटकानेच ह्या एकाकी पणाला सोबत दिली आणि 'विजया खोटे' 'विजया मेहता' झाल्या. त्यानंतर लंडनला स्थलान्नतर केले आणि तिथेच अनेक संस्थानमधून तिथल्या रंगभूमीची ओळख जवळून करून घेतली. इकडे एक नवीन प्रवाह गवसात होता तर भारतात रंगायनाला ग्रहण लागले. जेव्हा त्या परत भारतात आल्या तोपर्यन्त बरेच पाणी पुलाखालून गेले होते आणि लवकरच 'रंगायन' आपला आगळा वेगळा ठसा लोकांच्या मनावर ठेऊन रंगमंचावर कायमचा पडदा टाकून गेली. यापुढचा प्रवास व्यावसायिक नाट्याविश्कारातुन होत राहिला आणि अनेक नवे कलाकार आणि नवी नाटके जन्माला आली. त्यांच्यात असलेला प्रायोगिक नाट्य दिग्दर्शक कधीच स्वस्थ बसू शकला नाही, त्यानी एकापेक्ष एक सरस नाटके, भूमिका ह्या रंगमंचावर साकाराल्या विशेष उल्लेखनीय , दुर्गा, सुंदर मी होणार मधील बेबीराजे, मादी मधील नायिका, अजगर आणि गंधर्व मधील वेश्या,संध्या छाया मधील नानी, हमिदाबाईची कोठीमधील हमिदाबाई आणि वाडाचिरेबन्दीमधील आई. विजया बाईनी अनेक कलाकाराना ह्या नाट्य स्रुष्टीत एक नवी ओळख नवे अस्तित्व दिले दिले जसे भक्ती बर्वे, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी आणि नाना पाटेकर. विजया बाईन्चे नाट्य विश्व मराठी पुरतेच संकुचित न रहाता ते हिंदी, जर्मन आणि ईंग्लिश मधेही त्यानी ते विस्तारीत केले.

नाट्यातून त्यानी शाकुन्तल, हवेली बुलंद थी,वाडा चिरेबंदी आणि हमिदाबाईची कोठी यांच्या टेलिफील्म्स केल्या तसेच लाइफ लाईन ही स्मरणीय दूरदर्शन मालिका.

ह्या पुस्तकाबद्दल लिहायचे म्हन्टले तर प्रत्येक अनुभव हा कागदावर जिवंत करणे अशक्यप्राय आहे. ते अनुभवायचे असेल तर नाट्य वेड्या माणसाने नाटकाच्या जन्माची,सृजनाची ही गाथा जरूर वाचावीच. शेवटी मनात विजया बाईन्चे शब्द रुळतात, " नाट्यस्रुष्टीत 'वर्तमान' काळ असतो. प्रत्येक प्रयोग अन् त्यातले प्रसंग, संवाद प्रेक्षकान्च्या साहाय्यान वर्तमानकाळातच घडत असतात. आज आणि आता. चित्रफितीत असतो केवळ 'भूत' काळ. झाल ते होऊन गेले. प्रेक्षक असोत अथवा नसोत चित्रफीत पडद्यावर, टीव्हीवर सुरुच राहाणार. नाटक प्रत्यक्षात घडते अन् संपते. पुन: पुन: घडते अन् पुन: पुन्हा संपते. नाटक घडते तो क्षण म्हणुनच बरेचदा अधिक सत्यस्पर्शी बनू शकतो.



मुक्ता पाठक शर्मा