Monday, September 6, 2010

व्यासपर्व ...दुर्गा भागवत

महाभारत आणि महाभारतातील पात्रे हे कायमच मानवी जीवनाचे तसेच मानवी स्वभावाचे विविध पैलू दर्शन घडविणारे महाकाव्य.व्यासपर्व या पुस्तकात दुर्गा भागवतांनी त्यांना दिसलेली प्रत्येक पात्राची रुपे अभ्यासात्मकरित्या समोर मांडली आहेत.यांत कोणत्याही व्यक्तिरेखेचा विनाकारण बडेजाव नाही की विनाकारण कोणाच्याही स्वभावाचे खच्चीकरण नाही.जे जसे दिसले ,वाटले तसे ते प्रामाणिकपणे मांडले आहे.
भाषाशैलीही एका वेगळ्याच काळाचे स्मरण करुन देते.
व्यासरचित महाभारता बद्दल बोलतांना त्यांची लेखणी सहजरित्या लिहुन जाते,"प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्यातल्या समतोलात व्यासाची नाट्याची धारणा निपजेली आहे.नाट्यातली नाट्ये महाभारतातच पहावी.इतकी दृष्ये विविध छटांत,विविध रंगांत, विविध नादांत,कधी वर्णनांत,तर कधी संभाषणांत,तर कधी नुसत्या सूचनेत व्यासाने सढळ पेरुन ठेवली आहेत."
"व्यासाचे अनुपम नाट्यवधान ज्या त-हेने प्रकट झाले आहे,ती त-हाही फार नाजूक आहे.सुक्ष्म व तरल आहे.
महाभारतात सत्व रज तम या त्रिगुणात्मक स्वभावरचनेच्या असाधारण भानामुळेच व्यासाला महाभारताच्या अगणित व्यक्तिरेखा क्षणाक्षाणाच्या कृतीच्या आलेखानुसार कोरता आल्या,जिवंत करता आल्या,हाडामासाने भरलेल्या मनस्वी व्यक्ती म्हणुन दाखवता आल्या.यामुळेच खलत्व एका व्यक्तीत कोंडून ठेवून खोटे किंवा मानीव मानवी आदर्श निर्माण करण्याचा खटाटोप त्याला करावा लागत नाही.’
व्यासाच्या धर्मावगुंठित कलेचा विशेष हाच की ती लेण्यांतल्या शिल्पाप्रमाणे ज्याला जसे बघण्याची इच्छा असेल,ज्याची जशी पात्रता असेल,तसे त्याला अनुकूल असे आंतरिक विश्व प्रेक्षकांत,वाचकांत वा श्रोत्यांत खुले करते.व्यासाची प्रतिभा क्रांतदर्शी आहे ती याच अर्थाने की ती क्षुद्र,संकुचित ,सव्यंग,पापपूरित,कुरूप व्यक्ती व घटना यांनाही सरळ आत्मसात करते.केवळ नीती सौंदर्य, भव्यताच तिला प्रिय आहे असे नाही. हा समभाव केवळ स्व:ताच्या निर्मितीकडे अति अलिप्त व अतोजागरुक दइष्टीने पाहाणा-या प्रतिभावंतालाच साध्य असतो.विश्वरुपदर्शन हे या व्यापाराचे प्रतीक मानायला हरकत नाही.नियतीचा खेळ हे महाभारताच्या कथेचे महत्वाचे सूत्र असले तरीही,एक सत्य सतत भासमान होत राहते.मानवाची भौतिक नियती इतर जीवसृष्टीप्रमाणेच आहे;परंतु मानवाचे आत्मिक जीवन हे सर्व भौतिक अविष्कारापलिकडील चिन्मय शक्तीशी निगडित आहे;हे सत्य महाभारतातील दैववादाच्या बुडाशी आहे.."

व्यासांनी ,मानव कितीही विकसनशील असला तरी अंतर्गत संघर्ष त्याला अटळ आहे हेच मुख्यत: लहान मोठ्या स्खलनातून दाखवित गेले.या अनंत स्खलनाच्या परिपाकाला त्यांनी "दैव" म्हंटले आणि त्या दैवाच्या विराट लीलेत मानवी जीवनाचे धागे दोरे कसे गुंफले आहेत हे पावलो पावली कर्मगतीच्या तत्वज्ञानाच्या आधारे दाखविले आहेत.
एव्हडेच नाही तर कर्माच्या पलिकडचेव अज्ञाताचे भानदेखील मानवाच्या आत्म्याला येऊ शकते,ही श्रद्धा सर्व नैराश्याला, सर्व भीरुतेला व साशंकतेला दूर सारते आणि मग त्या अज्ञात सत्याच्या प्रतीक्षेची तीव्र,उन्मनस्क उत्कंठा सर्व व्यवहारांना, भैतिक व्यापारांना व भावनांना, त्यांचा साचा जराही बदलू न देता, नव्या आशयाने भरुन ताकते. आणि म्हणूनच ’तमसो मा ज्योतिर्गमय’ या अओपनिशदिक वचनाचा काव्यमय व प्रत्य्क्श प्रत्ययही महाभारतातुन येतो.
दुर्गा भागवतांनी महाभारतातील पात्रांचे विश्लेषण १० भागांतुन केले आहे.
पूर्णपुरुष कृष्ण मध्ये कृष्णाच्या जन्मापासून ते त्याच्या निर्वाणापर्यंत त्याच्या प्रत्येक अवस्थेचे कार्य,कर्म व त्याची सांगाती मांडली आहे. एक अवस्था टळली की तिजकडे कधी मागे ना वळून पाहाण्याचे त्याचे वास्तवाचे भान हे वेगाने महाभारताला पुढे नेते तर त्याच बरोबर मानवी जीवनाचे सत्य मांडुन जाते.

मोहरीतील ठिणगी मध्ये एकलव्याचे भोक्तृत्व, द्रोणाची पिडा आणि त्यामुळे त्याच्या मनात निपजलेला हिनतेचा भाव एक वेगळाच पैलू समोर आणला आहे.
दृपदाकडुन झालेला अवमान,लहानग्या अश्वत्थाम्याचे दुधासाठी रुदन...असे एकानंतर एक घडत जाते आणि नियतीने की प्रकृतीने केलेले मानवी जीवनात तसेच स्वभावातले परिवर्तन मांडले आहे.
आणि या स्वभाव परिवर्तनामुळे जे दु:ख(?) एकलव्याच्या वाटेला आले वा जी भळभळ्ती जखम घेउन अश्वत्थामा अजुनही वणवण रणरण भटकतोय ह्याला जबाबदार द्रोण आयुष्यात कधीच सफल होत नाही.ना गुरु म्हणुन ना एक पिता म्हणुन तो कुठेतरी कमीच पडतो.हे जितक्या क्लिष्ट्स्वरुपात महाभारतात दाखवले आहे त्याला तितक्याच सहजतेने दूर्गा भागवतांनी सहज सोपे करुन मांडले आहे.
ह्याची पुढील पायरी म्हणजे अश्वत्थाम्याचे जीवन कोंडलेले क्षितिज मध्ये मांडले आहे. कोंडलेले क्षितिज हे नावच खुप काहे सांगुन जाते..भव्यता,दिव्याता आणि अथांगता.

"यक्तिरेखा हरवलेला माणुस" मध्ये दुर्योधनाच्या जीवनावर प्रकाश घातला आहे.
अंध माता पित्यांच्या पोटी जन्माला आलेला,लाडाकोडात वाढलेला ,स्वबुद्धि योग्य दिशेन न चालवणारा एक पराजित पुत्र,राजा.मात्र सदैव जीत असा मित्र.

"एकाकी" मध्ये कर्णाच्या जीवनाचा जो आढावा घेतला आहे तो विचारांचे एक मंथन घडवुन आणतो.
कर्णाच्या व्यक्तिरेखेला मांेडतांना व्यासांनी कुठेही हात मागे राखला नाही आहे. जीवनात कर्ण चूकतो पण त्या चूकीच्या करणीचे त्याला फळही मिळते. सत्य त्यापासून लपलेले नाही तरी तो उघडपणे सत्याला स्वीकरुन पांदवांची बाजु घेत नाही अगदी कृष्णाने द्रौपदीचा मोह दाखविला तरी तो दुर्योधनाशी असलेल्या मैत्रीच्या वचनाला जागतो.तो दानशूरा पेक्षाही दानविर आहे कारण आपली कवच कुं्डले गेली तर आपसूक आपला पराजय आहे आणि आपल्या मित्राची हार आहे हे त्याला माहित आहे. हे असे करण्यामागचा त्याचा उद्देश काय? सारी वासना सर्व कटु कर्तव्याच्या भावना सारे पीळ आणि समर्पणाची परिपूर्ती आहे का ही? कर्णाचे मरण तर या सम्र्पणाच्या क्षणीच निश्चित झाले आहे.
पैलु न पादलेल्या हि-या सारखे कत्र्णाचे व्यक्तित्व आहे.त्याच्या अंतरात तेजोगर्भ आहे. बाहेर खडबडीतपणा.

"परिकथेतून वास्तवाकडे" अर्जुनाचे व्यक्तिमत्व मांडले आहे. कुंतिचा पुत्र,पांडवातला उतकृष्ट धनुर्धर,द्रौपदीचा प्रियकर, कृष्णाचा प्राणसखा असे आणि कितीक व्यक्तिरेखा.

"मुक्त पथिक" मध्ये पूर्णत्वाची ओढ लागलेल्या ज्येष्ठ पांडवाची अर्थात युधिष्ठिराची प्रतिमा मांडतांना व्यासांच्या श्रेष्ठत्वाची कल्पना एक वेगळाच साक्षात्कार देउन जाते. तीन कौंतेयांचे तीन रंग आहे. यांत युधिष्ठिराचे व्यक्तिमत्व सर्वात नेटके आनि उमदे.
या ज्येष्ठ बंधू म्होरक्या आहे याच अर्थाने की त्याच्या वचनात त्याचे बाऊ आहेत. पण जिथे क्रिया आली तिथे हा आपला छायेत जातो आणि भावांकडून या त्या क्रियेची फलश्रुती झालेली पाहतो.स्वत: हा कधीच पुढे झाला नाही.पण क्रिया ओसंडली आणि तिच्याभोवतीचे अन्मादाचे अवसान जिरले , की एक प्रकारची सून्य पोकळी निर्माण होतेच.तशी पोकळी निर्माण झाली,की तिच्यात फिरुन चैतन्य ओतून,नव्नुतन क्रियेचे बीज पेरून,आपल्या भावांच्या कर्तृत्वाला पूर्णत्व आणू पाहाणारा फक्त युधोष्ठिरच.कारण युधिष्ठिराला तहान लागलेली होती ती पूर्णत्वाची. अपूर्णतेची त्याची जाणीवही त्यामुळे इतरांपेक्षा अधिक प्रगल्भ व धारधार होती.प्रत्येक भावाच्या क्रियेमागे युधिष्ठिर आहेच. कधी तो क्रियेला प्रोत्साहक, तर कधी विरोधीही असतो.

अश्रु हरवल्यावर या लेखांत भीष्मा बद्दल लिहितांना शब्द कमीच पडतात असे ते व्यक्तिमत्व आहे.या व्यक्तित्वाची उच्चता आणि खोली इतकी आहे की हा लेख अपूर्ण आहे असेच वाटते.

माणसांत विरलेला माणूस मध्ये विदुर..एकाच पित्याचे संतान असुनही दास्यत्वाची जी मोहर घेउन जन्माला आला आणि त्याला जन्मभर जागला. आणि जगतांना सत्याची साथ आणि सत्याचरण आणि सत्यपदेश करित जीवन व्यतीत केले.

कामिनी या लेखात द्रौपदीची कथा आणि व्यथा दोन्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.द्रौपदी हे महाभारतातील असे एक पात्र आहे की जिचे दु:ख कधीच कळूनही मांडता येत नाही.सर्वकाही मिळुनही रिकामीच झोळी घेउन जिवंतपणीच जळत रहाणारी शापित स्त्री.

2 comments:

  1. Very well written. Really enjoyed reading this!

    ReplyDelete
  2. आधी व्यासांचं महाभारत अवाढव्य त्यातल्या नेमक्या व्यक्तिरेखांचं विश्लेषण दुर्गा भागवतांसारख्या विदुषी नी व्यासपर्वामधे केलं त्यातलं सार वेचून समोर उचित मान देऊन मांडणं सोपी गोष्ट नाही. सुंदर निरीक्षण 🙏

    ReplyDelete