शांता शेळकेंच्या कविता असो वा त्यांचे इतर साहित्य असो त्यांच्या इतर सर्व लेखनांमध्ये त्यांच्या ललित लेखाचे वैशिष्ठ्य अनोखे आहे. मनात येणारे सहज विचार शब्दरुपाने दृश्य रुप घेउन जेव्हा मनापर्यंत पोहचतात तेव्हा एक अनोखा आनंद वा अनुभव होतो.
ललित नभी मेघ चार मध्ये शांता बाईंनी आपल्या काही निवडक नव्या जुन्या २८ लेखांचे संकलन केले आहे.
"अथ लेखनपुराणम्" ह्या लेखापासून ह्या ललित संग्रहाची सुरुवात होते. ह्यात शब्दांचे अभिजात रुप व स्वरुप ह्याबद्दल तर त्यांनी आपले विचार मांडलेच आहेत त्याच बरोबर शब्दांचे जीवनातील अविभाज्य असे स्थानही अगदी सहज रित्या मांडले आहे.समोर शुभ्र करकरीत कोरा कागद आल्यावर मन कसे लेखनाला आतूर होते आणि मनात चाललेल्या असंख्य विचारांना कागदावर मांडण्यासाठी हातही अधिर होतो हे सांगतांनाच त्याना किव येते ती त्या लोकांची जी लेण्या ऐतिहासिक ठिकाणे झाडे दगड इथेही आपली नावे कोरुन आपल्या भेटीची साक्ष ठेवून जातात. त्यांना हे लिखाण कधी विकृति वाटते तर कधी आंतरिक गरज.
सहजगत्या त्या लिहुन जातात,"शब्दांइतकेच त्याच्या लिखित रुपालाही महत्व असते. शब्दांचा आशय आपण मनाने वाचतो,तसे त्याचे दृष्य रुप आपल्या डोळ्यांना हवेसे असते. शब्दांच्या योगाने मनात उमटणा-या भावनासंवेदना हे जर शब्दब्रह्माचे निर्गुण रुप असेल तर शब्दांच्या दृष्य आकृती हे त्याचे सगुण रुप आहे."
शब्दांचे एकुण रुप अनेक प्रकारच्या भावनालहरी निर्माण करता ,कधी आकलनीय तर कधी अनाकलनीय.
त्यांच्या मनात अगदी आपल्याही मनात येणारा विचार येतो..मला लिहिण्याचा संकोच का वाटावा? अनेकदा मनात येते लिहायचे कशासाठी? हे वाचणार कोण? याचे महत्व केवढे? केवळ आपल्या क्षण्भंगुरतेची सलणारी जाणीव विसरावी,कशाच्या तरी द्वारा मरणानंतर चार दिवस जगात टिकावे, उरावे, इतरांच्या थोडेफार आठवणीत राहावे म्हणुन तर आपण हा लेखन प्रपंच करत नसु? माणसाच्या अंगी अनेक प्रकारचा दुबळेपणा आहे.त्यातलाच हाही एक दुबळेपणा असेल तर मग तो स्वीकारुन, मनोमन त्याची जाणीव बाळगून,जमेल तसे,न जमेल तसे सुद्धा लिहायला हरकत काय?
"मी कोण आहे?" ह्या लेखांत मनुष्याचा बालपण ते वृद्धत्वापर्यंतच्या प्रवासात आलेली स्वत:च्या अस्तित्वाची भौतिक ओळख होतांना ज्या कक्षा रुंदावत जातात, जी क्षितिजे विस्तारत जातात तो जीवन प्रवास उत्कृष्ट पणे मांडला आहे.
हा प्रवास अनुभवतांना त्यांनी लिहिले आहे ,"पण वय जसजसे वाढत चालले तसतसे माझ्या ध्यानात आले की, पायातली एक साखळी तुटली तर तिची जागा घ्यायला इतर कितीतरी साखळ्या पुढे येतात.डोक्यावरची एक जबाबदारी गेली तरी तिथे इतर जबाबदा-या आपल्या हजर आहेतच."
घर,जात, प्रांत, देश, भाषा,धर्म,इतिहास अशा पाय-या एकामागे एक ओलांडत आता मी अशा जागी येऊन पोहचले आहे की तिथून मागे वळून बघताना हे सारे खूप दूरस्थ,अंधुक वाटते.
हे सारे दिव्य पार करतांना कधी कधी स्वाभाविकपणे मनात येते की सारे हे पाश तोडावे.आपले आपण आपल्या सा-या क्षुद्रतेसह आपणच असावे असे वाटते.आभाळाने टाकली आणि धरणीने झेलली इतके मला भोवतालच्या या सा-या बंधनांपासून मोकळे नाही का होता येणार?मी स्वतंत्र अशी कधी होइल का?माझी केवळ मीच अशी आत्मनिर्भर,आत्मपर्याप्त अवस्था मला कधी लाभेल का? जसा आभाळात तरंगणारा ढग,जशी वा-याची स्वैर झोळूक,जशी पावसाची हलकीशी सर,जसे एखादे पान किंवा फूल तशी मी मुक्त,नुसती केवळ अशी असेन का?
No comments:
Post a Comment