Thursday, March 22, 2012

झेन गार्डन ----मिलिंद बोकील


झेन गार्डन या   मिलिंदा बोकिलांच्या कथा संग्रहात त्यांच्या पूर्व प्रसिद्ध झालेल्या ८ कथांचा  समावेश आहे.
पहिलीच कथा "यंत्र" नावाची आहे .एका महाकाय यंत्राची  कथा म्हणण्यापेक्षा त्या यंत्राशी   साधलेला हा एक संवाद आहे.
यंत्र दुरुस्ती करणारा 'हरिहर" आणि त्याच्या प्रयत्नांचा अंत पहाणारे यंत्र.

भाषा ओघवती आहे त्यामुळे वाचतांना मजा येते आणि पुढे काय होईल याची उत्सुकता लागून रहाते.
निर्जीव कारखान्याला वा यंत्राला ही जीव आहे असेच भाषेतून प्रतीत होते .
कारखान्याच्या अवाढव्य पणा बद्दल लिहून जातात .."महाकाय पंखे.अंतराळातून खाली उतरलेल्या असंख्य  ट्युबलाईट्स. पण त्यांचा पांढरा प्रकाश  लोखंडी पोकळीने शोषून घेतल्यासारखा .आणि सगळ्या हवेला एक लालसर गरम लोखंडी वास."
 प्रचंड महाकाय यंत्राचे  वर्णन करतांना त्याच्या भव्यतेची आणि ते  बिघडल्यामुळे शांत झाल्याची जाणीव शब्दातून करून देतात..."पाय पोटाशी घेऊन शांत पहुडलेले.भव्य निरागस..."

हरिहरचा सुरुवातीचा उत्साह , क्लिष्ट यंत्राचे दोष चुटकी सरशी सोडवण्याची त्याची हातोटी आणि त्यामुळे नकळत आलेला सार्थ गर्व /अभिमान हळू हळू कसा निरसत जातो. सुरुवातील यंत्राशी जणू युद्ध पुकाराल्यागतचा त्याचा अविर्भाव अगदी यंत्राला नाठाळ, खोडील,अडाणतट्टू आणि नंतर प्रेमाने हळूवार त्याला आंजारत गोंजारत त्याच्याशी केलेला संवाद एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातात.

दुसरी कथा "अधिष्ठान".
कथेच्या नावावरून कथेचा गाभा प्रतीत होतो. गायत्री आणि विश्वनाथाच्या नात्याचे अधिष्ठान, त्यांनी पत्करलेल्या मार्गाचे अधिष्ठान की पत्करलेल्या मार्गाला पूर्णत्वाला नेण्यासाठी केलेले अधिष्ठान ! असे अनेक विचार मनात येत रहातात ही कथा वाचतांना.
स्थित्यंतर हा जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी काही वळणे परत लागतात. काळ पुढे गेलेला असतो, त्याच बरोबर त्या वळण वाटांवर अनेक बदल  घडून आलेले असतात. असे असले तरी मूळ प्रवृत्ती बदलत नाही. नात्यामधला ओलावा ते नातं  टिकवून ठेवते. अपेक्षांच्या ओझ्यात नातं दबून न जाता ते अपेक्षारहित प्रेमात ते फुलून रहात.

तिसरी कथा "निरोप"
ही कथा एक "स्थिती" आहे. जी प्रत्येकाने अनुभवली असेल अशी.
कधी न पाहिलेली माणसे  जिव्हाळा लावतात. आणि नकळत त्यांच्या  बद्दल आपुलकी वाटू लागते.
रामाकांताचेही असेच काही होते , जगण्या,राघो,कमल्या,आत्याबाई आणि अंजी ह्या सगळ्यांच्यात तो रमून जातो. अबोल नात्याचा  धागा त्याला आठवणींचा साठा देतो.

चौथी कथा ,"आभास"
बिरवाडीत रघुनाथ ,सिमतेरेझीया सिस्टरच्या मिशन मध्ये येतो, तेव्हा त्यांच्या बद्दल निर्माण झालेले कुतूहल, घरदार सोडून इतक्या दूरच्या देशात आणि तेही एका विराण गावात  मिशनच्या कार्याला वाहून दिलेला जन्म ह्या सगळ्या गोष्टी उकलू लागतात. ही कथा वाचताना कुठेही अवाजवी शब्दांचे अवडंबर नाही. संथ पुढे जात एका बिंदूवर येऊन एक आभास देऊन जाते.

पाचवी कथा ,"आरंभ"
World organization of anthropologist चा एक शास्त्रद्न्य कझान बेटावर जायला निघतो आपल्या सहका-याच्या, Walter च्या शोधात. तिथली आदिवासी जमात सगळ्या जगापासून अनभिज्ञ आहे. जगात महाविनाशी अनुयुद्ध सुरु झाले आहे. मानव जातीचा ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने केलेला प्रयास ह्या कथेत वाचायला मिळतो. Walter  त्याच्या डायरीतील टिपणे,त्याचा हत्या करून लटकवलेला देह,  ह्या सार्या गोष्टी पुढे येणा-या घटनांची नांदी !
शेवटी जमेल तसे शिकान पर्वताच्या दगडात जे जमेल ते कोरून, शेवटच्या श्वासाबरोबर "आरंभ" होणारा एका नव्या युगाचा प्रवास ! 

सहावी कथा "साथीन"
प्रभाबरोबर एका राजस्थान मधल्या छोट्या गावात शिबिराला आलेली रेवती जेव्हा गावातील स्त्रियांचे धाडस, त्यांनी एकजुटीने केलेला अन्यायाला विरोध पाहून अचंबित होते आणि आपसूकच मनात दाटलेले मळभ बरसवून टाकून निरभ्र बनून परतते.
चंपा,मनकी,मितल, हिराबाई या सगळ्यांमध्ये तिला आपली मैत्रीण ,साथीन मिळते.

सातवी कथा, "पायऱ्या"
यशाच्या पाय-या चढून गेल्यावरही जमिनीवर पाय असणारा श्रीपाद, आणि जेव्हा तो कामगार  चळवळीचा भाग होता तेव्हा त्याच्या बरोबर असणा-या जया,अशोक यांच्या मधल्या मैत्रीची कथा. माणूस कधी पाया-या चढतो तर कधी पाय-या उतरतो....लाक्षणिक अर्थाने नव्हे तर कर्माने सुंदर रीत्या रेखाटले आहे.

आठवी कथा "झेन गार्डन"
जपान मध्ये झेन गार्डन ला भेट देणारी कल्याणी आणि तिला तिथे घेऊन जाणारा निरंजन यांच्यातला संवाद एका वेगळ्या अनुभूतीचे दर्शन देऊन जातात.No comments:

Post a Comment