Tuesday, September 28, 2010

कृष्ण किनारा....अरुणा ढेरे

नुकतेच दूर्गाबाई भागवतांचे "व्यासपर्व" वाचनात आल्यानंतर अरुणा ढेरेंचे "कृष्ण किनारा" वाचायला मिळाले. आणि परत महाभारताशी संबंधीत स्त्री पात्रांशी संवांद साधला गेला. कृष्ण किनारा या पुस्तकात ३ स्त्री पात्रांबाद्दल अरुणा ढेरेंनी लिहिले आहे.
त्या तिघी : राधा, कुंती आणि द्रौपदी. शतकांपूर्वीच्या कथा-काव्यातून वावरणा-या. काळाची दीर्घ, अवघड वाट चालतांना व्यक्तित्वाची लहान सहान स्फुरणही जपत आपल्या मनापर्यंत येऊन पोहचलेल्या. आपण निरखतो त्यांना. त्यांच्या भावजगताचा पैस अजमावू पाहतो.समजू पाहतो त्यांच्या स्त्रीत्वाची जातकुळी,आणि पूर्ण्पुरुष कृष्णाच्या अथांग आयुष्याचा एखादा किनाराही त्यांच्या आयुष्यातून शोधू पाहतो. त्या तिघींची समजूत मोठी.थोड्या थबकतील,वर्तमानाला देऊन टाकतील त्यांचं देणं,आणि काळाच्या दीर्घ,अवघड वाटेनं पुढे जातच राहतील.

ह्या तिघी वेगळीच जातकुळी घेउन जन्माला आलेल्या,आजन्म देण्याचेच कर्तव्य पार पाडत आलेल्या. साधारण, सामान्य स्त्रीच्या जीवनापलिकडे जाऊन गवसलेल्या असामान्याच्या ताकदीवर आयुष्य घडविणा-या.

हे पुस्तक प्रस्तावनेपासूनच मनाची पकड घेत जातं. प्राचीन साहित्याची गौरव गाथा मांडतांना निघालेले शब्द पुढे मांदून ठेवलेल्या शब्द राशींची कल्पना देतात. शब्दा शब्दातून कृष्ण किनारा आपल्याला सापडतो आणि वैचारिक रपेट सुरु होते. कधी मनाची कालवा कालव, तर कधी मनाची घालमेल, तरी त्यातून कुठेही तोल ना जाऊ देता साधलेला समतोल मनाच्या निळाईच्या अथांगतेची पूर्ण जाणिव करुन देतो.

प्रस्तावनेतच "हे का लिहिलं?" हे प्रश्नचिन्हच सा-या उत्तरांना वाट करुन देतं. सहजगत्या अरुणाढेरे सत्य सामोरे आणतात.."हे परंपरेचं जग मोठं अद्भुत आहे !कधी तत्वज्ञानाच्या अतिसुंदर चांदण्यानं झगमगतांना, तर कधी मनाविषयीच्या खोल समजुतीच्या निळाईनं वेढलेलं असताना, तर कधी उदाताच्या, सर्वकल्याणाच्या उन्हात प्रसन्न हसताना, तर कधी सुख दु:खाच्या विविध रंगांनी बहरुन येताना ते जग पाहिल की, खरोखर आपण स्तिनित होतो. पण पृष्ठभागावरच्या नवलाईखाली तळघरही आहेत अंधाराची, आणि त्यातलं एक मला थोडसं दिसलं. पुष्कळ बायका तिथे मरुन पडलेल्या मी पहिल्या, कुणाच्या गळ्याला देवत्वाचं नख लागलेलं,तर कुणी पातिव्रत्याचं विष प्यालेलं.कुणी निरागसतेचाच कलंक लागून मेलेली.तर कुणी समाज पुऋषाच्या कठोर मिठीत घुसमटून गेलेली.काही झगडल्या होत्या,तर काही ताठ मानेनं जगल्या होत्या. काही अबोल सोसणा-या होत्या. मी एकदाच ते विलक्षण दृष्य पाहिलं,पण आजवर ते विसरु शकले नाही. त्या तळघराच्या अंधारातून येणारा मृत्यूचा वास वेळी अवेळी मला अस्वस्थ करुन टाकतोच आहे. डोळे मिटले की त्या असंख्या बायकांपैकी कुणी ना कुणी मला दिसतेच आहे. कुणी देवळात देवी होऊन बसलेली.कुणी नाटक सिनेमातलं एखादं पात्र म्हणुन आलेली.....या अनुभवातून बाहेर यायचं कसं? एक उपाय म्हणून लिहावसं वातलं.त्या लिहिण्याची ही अगदी लहानशी सुरुवात आहे. फक्त तिनच तुकडॆ..."

राधा ,कुंती आणि द्रौपदी बद्दल कथारुपाने लिहिले आहे..एक एक प्रसंग जणू आपल्या समोर घडत जात आहे एखाद्या चलत चित्राप्रमाणे असेच वाटते. आधी व्यासपर्व वाचल्यामुळे, दूर्गाबाई भागवतांच्या अभ्यासात्मक लेखांचा मनावर पगडा जास्त बसल्यामुळेही,काही ठिकाणी काही बारकावे प्रभावी नाही वाटत. मूळ महाभारत आणि मांडलेल्या स्त्री पात्राच्या व्यक्तिरेखा ह्यात कधी कधी थोडी तफावतही आढळुन येते. पण एक कथानक म्हणुन असामान्य अशा पात्राच्या मनाचा गर्भ उलगडतांना त्यात एक सामान्य मनही आहे ह्याची तीव्र जाणिव होते. स्त्री जातीचा पिंड हा एक आहे आणि तो एकमेकींच्या जीवनाशी कुठे ना कुठे साधर्म्य साधतो हे जाणवु लागते.

तिनही व्यक्तिरेखा मांदतांना लेखिकेला द्रौपदीने भूरळ पाडली आहे हे प्रकर्षाने जाणवते. प्रत्येकीच्या तोंडी असलेले द्रौपदीचे उच्चारण प्रत्येक पात्राला कृष्ण किना-याबरोबर कृष्णेची झालरही देऊन जातात.

पहिला परामर्श राधेच्या जीवनाचा घेतला आहे. अनेकांप्रमाणेच इथेही राधा ही एक प्रेयसीच्याच रुपाने अवतरते.
राधा खरच प्रेमिका होती का? हा प्रश्न नेहमीच माझ्या मनात येतो. कारण कृष्णाने गोकुळ सोडले तेव्हा तो इनमिन सात आठ वर्षाचा होता आणि राधा त्याच्यापेक्षा बरीच मोठी होती.अशा स्थितीत त्यांच्यात प्रेम संबंध होते की ते वात्सल्याने परिपूर्ण असे नाते होते?  हा प्रश्नांचा सारा डोलारा मनात घेउन "राधेला" वाचले. प्रेमिकेच्या भुमिकेतून योग्य वाटणारे असेच हे कथानक.
एक दिवस आचानक राधा द्वारकेत कृष्ण महालात येउन पोहचते आणि तो तिला सागर किनारी असलेल्या मंदिरात भेटण्याचे वचन देतो. इथुनच भूतकाळाची आणि वर्तमानाची घालमेल सुरु होते.जे सोडुन आलो कायमचे ,ज्या कडे कधी फिरुनही पाहिले नाही ते असे अचानक समोर येणे..आनंद मानावा की हळवी जखम पुन्हा ओली झाल्याच्या वेदनांत विव्हळावे अशीच काहीशी कृष्णाची स्थिती.
शब्दांतून आपण अर्थ शोधावे असेच काही ठिकाणी वाटते. कृष्ण राधेला सागर किनारी भेततो तेव्हा राधा त्याला विचारते," बासरी आणली असती, तर वाजवली असतीस रे पुन्हा !" यावर तो म्हणतो," नाही राधे. द्वारकेच्या या समुद्रावर तुला ऐकू आली नसती ती नीट.हा आवाज ऐकते आहेस ना पाण्याचा ? जोर बघ किती आहे वा-याला. इथे बासरी वाजायची नाही. आणि माझ्या जवळ आहे कुठे बासरी ! गोकुळातून निघालो तेव्हा तू ती जी हिसकावून घेतलीस,तिच्यानंतर बासरी आलीच नाही माझ्या हातात.मला वाजवायची नव्हती,म्हणून मग मिळविलीही नीही मी ती फार अट्टाहासानं"
गोकुळात मागे सारे सोडून कर्तव्यपरायण होऊन सारे जीवन जो राबला त्याला जेव्हा राधा विचारते,"तूझ्या निघून जाण्यानं मागे केवढा आकांत उठला,हे तुला कधी समजल का रे नंतर." यावर कृष्ण जे उत्तर देतो ते थोडे निष्ठुर वाटते पण तितकेच तात्विकही.." तपशील नाही कळाला. म्हणजे मी समजून घेतलाच नाही कधी मुद्दाम म्हणुन.त्याची जरुउर होती. खरच?".
्गोकुळातून निघाल्यावर जे घडणार होते ते माहितच ्होते तेव्हा मागाहून जे घदले त्याच्या खोलात जाऊन त्याची नव्याने काय माहिती होणार होती असे काहीसे तर म्हणायचे नाही ना?, असेच असावे बहुदा.
मी का आले ? ह्या राधेच्या प्रश्नावर जे तो बोलून जातो ते अनोखेच,ज्यातून एक वेगळा अनुभव एक वेगळी अनुभूती झाल्याची जाणिव होते.
राधेने आंतरबाह्य सारे कृष्णार्पण केले आणि तिला त्याने जीवनभर पूरुन उरेल इतके लसलसते जिवंत दु:ख दिले.ते तिने घेतले कसे?कुठे ठेवले? त्याचं काय केल? कशी जगली त्याच्याबरोबर ? एक ना अनेक प्रश्न चिन्ह....ह्या सगळ्या अनुभवांचे देणं आहे आहे..याचाच अर्थ जीवनाच्या प्रत्येक वळणावर तिची आठवण होती की तो तिलाच सर्वठायी शोधत होता? ह्याचा तपशिल पुढे येतोच.रुक्मिणी हरणात रुक्मिणीच्या धुंद चेह-यात त्याला राधा आठवते.भामेच्या रागात राधा आठवते,द्रौपदीच्या प्रश्नांत त्याला राधा आठवते...पदोपदी जे मागे सोडून आला आहे त्याचा साक्षात्कार त्याला पुढ्यात होत राहतो.
जेव्हा तो तिला क्षमा मागतो, मी चुकलो मला क्षमा कर म्हणतो .यावर तिचे उत्तर जणु ती त्याच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगाची साक्ष असल्यागतच वाटते. ती म्हणते," मी कोण तुला क्षमा करणारी? मी स्व:ताला भाग्यवान समजते. माझ्याकडे वळूनही न पहाता गेलास,पण माझ्याजवळ जुन्या क्षणांची पुरचुंडी होती दिवस काढायला आणि त्या क्षणांना तू मोहोळ होण्याची जादूही दिली होतीस. माझ्या जवळ एक विरहाचं दु:ख होतं लसलसणारं आणि तू माझ्यासाठी कुठेतरी आहेस जागाच्या पाठीवर याचानिदान दिलासा होता. पण..पण तिने काय करावं? जिच्या केसांची आठवण ठेवून शिष्ठाईला गेलास,जिच्या मनात आपल्या प्रेमाची खूण दिव्यासारखी ठेवून निघालास.कृष्णेची लालूच कर्णाला दाखवून तिचाच की रे सौदा केलास ! तिच्यासाठी हा अपमान केवढा असेल?
आणि कृष्णा तिही किती मोठी ! तिनं सगळं सहज बंद केलं मनात.तू दिली असशील सफाई,युद्ध,धर्म,राजनीती, यांच्या मोठमोठ्या गोष्टी केल्या असशील. ती काय समजली नसेल? अरे जी द्यूत सभेतल्या तुझ्या चमत्काराचा अर्थ समजू शकते ,तिला या प्रसंगाचा अर्थ समजलाच नसेल? पण तिनं ते ही गिळलं माधवा... प्रेम फार जहरी असतं रे...फार कडू असतं गिळायला...मला विचार. तुला गिळता गिळता माझा रंग बदलून गेला आहे बघ.

पुढल्या एका प्रसंगात जेव्हा राधा म्हणते ," माझं फक्त तुझ्या अपुरेपणाशीच नातं होतं’ यावर तो मिश्किलीने म्हणतो,’ आपलं स्वतंत्र जगणं अटळ आणि आवश्यक आहे. हे तू जेव्हा सहज स्वीकारलस ना, तेव्हाच माझ्या बरोबर, पुरेपणाशी तुझाही वायदा हौन गेला. हे तुला कळलच नाही बहुदा. मग उरलं त्या एक्क बिंदूकडे आपापल्या आयुष्यातून सरकत जाणं. त्या बिंदूवर आपण भेटणारचं होतो.’

जेव्हा तो तिला विचारतो,’तू सुखी होतीस मधल्या काळात?’
ती उत्तरते ,होतेही नव्हतेही, कारण माझ्यासाठी अनयाचं उबदार मन हे एक वास्तव होतं,विश्वास टाकावा असं वास्त्व होतं आणि दुसरी कडे तुझं दाट निळं प्रेम हेही एक वास्त्वच होतं. एक पार्थिव होत, दुसरं नव्हतं पण माझ्या मुठीत तर दोन्ही होतं, मी का सुखी नसावं? आणि भाबड्या कारणासाठी नव्हतेही - म्हणजे मला ही दोन्ही प्रेमं - ती दोन्ही सुखं घेऊन मिरवता नव्हतं येत.’म्हणुन खूप खंत केली आहे मी ! पण मग दिवस जात राहिले तसं कळलं मला देखील. कळलं की सत्य माहित असावं मनातून. जिवापाशी नेहमी असावा त्याचा उलगडा.पण ते उच्चारयचं असतं अगदी कधी तरी. वेळ आली तरच.तशी वेळ आज आली. शेवटी आज आली.’
यावर त्याचे बोल तिला यशोदामाईची आठवण करुन देतात...तो म्हणतो तू स्व:ताच तुझ्या सुखाचं मिरवणं आहेस  बये, हे तुला कळतं तर..तू खंत केलीच नसती’ तेव्हा तिला उमगत..’माझं अस्तित्वच एक मिरवणं आहे’ आणि हेच यशोदेने ओळखलं आणि शेवटच्या क्षणाला बोलावून सांगितलं, ’जर कधी काळी वातलं... वातलं त्या बघावसं< तर पाय मागे घेउ नको. मान अपमान ठेवू नको. लक्षात ठेव की, ते उपकार नसतील त्याचे ! त्याला भेटलीस तर त्यालाच सुखानं मरता येईलं’ असं म्हणुन तिनं त्याच सार बालप्ण तिच्या ऒटीत टाकलं आणि यशोदामाई मोकळी झाली. मात्र राधा कृष्णाला म्हणते ,’मला माझ्या स्व:ताच्या प्रेमाचाही वेढा पडला आहे. म्हणून तर आले इथवर.त्यातून मोकळं होण्यासाठी आले. पण कृष्णा, एक लक्षात ठेव. ती आई होती. बाई आई होते तेव्हा तिला मुक्तीची वाट जेवढी जवळ असते ना, तेवडी इतरांना नाही. हे सगळ्या जणींना न उमगलेलं सत्य आहे.पण जगून जगून सगळ्या बायकांनी किती मऊ,किती उबदार केलं आहे त्याला ! त्याची घोंगडी माझ्या अंगावर येती, तर मीही यापूर्वीच सुटले असते. पण तसं नाही घडलं.मी तशीच उरले. कुडकुडत राहिले’ या तिच्या शब्दातली दु:खाची नस तिच्या मनाच्या खोल तळातल सार वर आणुन ठेवते.

त्यांच्यातील संवाद वेगळ्या पातळीवर येऊन पोहचतात.अनेक वेळा अनेक रुपके घेउन जीवनाचा अर्थ सांगून जातात. जेव्हा राधा द्रौपदीच्या स्वयंवराच्यावेळी असलेली कृष्णाची उपस्थिती आणि तेचे सावळे रुप अन तिचा यमुनेसारखा घमघमणारा सुगंध आपल्याला माहित आहे हे सांगुन कृष्णाच्या मनाचा ठाव घेते. गर्द रंगांच्या झिम्मडीत रंगून जाणारी ती कृष्णेला कृष्णाने भारंभार वस्त्रे पुरवल्यावर तृप्त होऊन निरंग होते यातून खुप काही अर्थबोघ होतो.तर सा-या प्रसंगातूनही निवळपणे पाण्यासारखा कृष्ण वाहत गेला, समुद्रासारखा त्या त्या वेळी रंगुन निघालास. पुन्हा कोणत्याही प्रसंगाची साधीशी खुण वा व्रणही नाही यावर त्याचही मार्मिक उत्तर येतं’ जगण्याची चव गेली बघ.खूप खारट,खूप तुरट लागतं आहे आयुष्य. युद्धानंतर राखेची चव कशी असायची? समुद्राचा विस्तार जेवढा अतळ असतो सई, तेव्हडाच त्याचा खारटपणाही अटळ असतो. त्याला गोडं राहाया येतं नसतं. वाटलं तरी’

जेव्हा तो म्हणतो,’ अनय हे माझचं मला एक चिर्वांछित रुप आहे,हे तुला ठाऊक कसं नाही?’ यावर ती हतबल होऊन स्व:ताला सावरते इथेच खुपसे अर्थ गवसतात.

जेव्हा निरोपाची वेळ येते तेव्हा तो तिचा निरोप घेउन न वळता निघतो त्यावेळी ती म्हणते अरे मी तुला भॆटायला आले तर मी तुझा निरोप घ्यायचा तर तूच माझा निरोप घेऊन निघालास....इथे या क्षणालाच असं वाटतं की ठा या भेटीचा अंत नाही तर परत फिरुन येणारी सुरुवात आहे.

दुसरी व्यक्तिरेखा कुंतीची.
कुंतीलाही माडतांना लेखिकेला द्रौपदीचा मोह सुतला नाही आहे. पदोपदी ती तुलनात्मक वा सरळ द्रौपदीचा उल्लेख करते. ह्या स्त्री रेखा एकमेकांत गुंतल्या सारख्या वाटतात. त्यामुळे कुंतीवर कुठेतरी अन्याय झाल्यासारखे वाटते.

कुंतीचे आयुष्य हे काही शब्दात रेखाटणे कठीणच. तिची ओळख ही पांडवांची आई  म्हणुनच राहिलेली.
तिचा विचार करायला गेले तर ती एकटीच आई होती, जे पुत्र होते ते तिचे एकटीचे..तिच्या रक्तामासातून जन्माला आलेले तरीही तिची ओळख बाजुला सारुन ज्याचा अंशही त्यांच्यात नाही अशा पंडूचे बनुन राहिलेले. तिला तिचे मातृत्व स्व:ताचे म्हणुन असे गाजवताच आले नाही.पंडु होता तेव्हाही आणि नव्हता तेव्हाही ,त्याच्याच सावलीत मिसळावे लागले.

कुंतीचे व्यक्तिमत्व समोर आणतांना ,ते हळूवर पणे उलगडत असतांना अनेक रंग सामोरे येतात..
अल्लड वयातली रात्री पाहिलेली चंद्रकोर असो वा दुर्वासांचा वर आणि त्यातून पुढे मार्गस्थ होत जाणारा प्रवास.
गांधारीशी युद्धपूर्व आणि युद्धानंतरचा आलेला संपर्क,वेगळ्या कोनातून कुंतीबरोबरच गंधारीच्याही मनाचा ठाव घेतात.
जेव्हा गांधारी विचारते,’कुंती तुला शूरसेनाच घर आठवतं का ग?’ इथे कुंती आपण दत्तक गेल्याच दु:ख विसरु शकत नाही त्याच बरोबर ते शल्यही.
आणि त्याचबरोबर गांधारीने मोकळेपणाने केलेली मनाची उलगड बोलून जाते.’गाधांरच माझं सोसायचं बळ होतं गांधाराच्या कोवळ्या आठवणींवर मी केवढी वर्ष काढली आहेत. तुला कळायच नाही.’
कुंती इथे विषादाने हसते आणि मनातच संवाद साधते..की हीच बहिणीची कमकुवत बाजू शकुनीने हेरुन सारी विषबिजे हस्तिनापुरात पुरली..

पुढे जेव्हा दोघींच्या संवादात भीष्मांचा उल्लेख येतो तेव्हा तिच्या जीवाची तळमळ पुढे येते आणि नकळत बोल निघतात.माझ्या द्रौपदीची परवड डोळ्यांनी पाहिली यांनी आणि यांच्या पाया पडावं आपणं? त्यांना शापावं इतकी तळमळले मी."
गांधारीही जुन्य आढवणींनी उदास होते.मुलांच्या हिडीस कृत्याची आठवण जग कधीही विसरणार नाही आणि क्षमाही करणार नाही.तरी तिला पितामहांच श्रांत मरण आठवतं आणि ती विचारते द्रौपदीच्या क्षमेशिवाय तसं मरण त्यांना शक्य होतं असं म्हणावं तरी कसं? यावर कुंतीही खेदाने म्हणते’ माझ्य सुनेनं क्षमा क्लीच होती त्यांना.म्हणून तर माझी जीभ मी उचलली नाही.’
कर्णाबद्दाल तिची ओढ आणि खर्ची घातलेला जन्म ह्या सगळ्यांची सल तिच्या शब्दांतून व्यक्त होते जेव्हा ती म्हणते’ तू पुढच्या जन्मी कुवारपणी आई झालेली कुंती हो माधवा,किंवा फार कशाला, नुसती बाई म्हणून जन्माला ये ! इथे असे वाटते की ती महाभारतातल्याच नव्हे तर सा-या स्त्रीकुळाचीच प्रातिनिधित्व ्करते आहे.

द्रौपदीशी मी धृताराष्ट्र व गांधारी समवेत वनात जाणार आहे ही सांगतांच तिने उच्चारलेल्या शब्दांतुन तिने द्रौपदीच्याही मनाचा थांग घेतला आहे हे प्रक्र्षाने जाणवते,’मी तुझ्या प्रेमाबद्दल विचारते आहे कृष्णे ! एक सांग, मी वापररेलं हे संबोधन उत्तरासाठी पुरेसं आहे?"

मातृत्वाच आवरण पूर्णपणे नष्ट होऊन फक्त एक स्त्री म्हणुन आपण उरलोय ह्याचा उल्लेख करतांना ती द्रौपदीला सांगते. द्युतसभेतेल्ल तुझे धिंडवडे बघुन माझ्या तली आई मेली. ही षंढ पोरं आपली नाहितच अस वाटल. युधाचे वारे वाहू लागले तसा माझ्यातल्या आईने थोडा तग धरला.कर्ण मेला तरी थोदा तग धरलाच होता.आणि जेव्हा मी माझं आणि कर्णाचं नातं सांगितलं आणि युधिष्ठिरानं शाप दिला तेव्हा माझ्यातली आई पूर्णपणे नष्ट झाली ! उरली ती फक्त बाई ! एक स्त्री. मी फक्त कुंती उरलेयं
यावर जेव्हा द्रौपदी तिला विचारते की मला कधी अशी सांती मिळेल का? या तडफडीतून सुटका होईल का?  तर, कुंतीचे उत्तर ’शांतीचं दुसरं नाव बाईच्या लेखी बरेचदा ’समर्पण’ असतं, हे तुला माहित आहे? मागचा पुढचा विचार न करता अशावर तरी ओवाळून टाकयचं स्व:ताला, आणि तृप्त होऊन संपूनच जायचं. तू अशी संपणारी नाहीस. सरळपणे कशाचाच स्वीकार स्वत:ला संपवत केला नाहीस तू. तुला तुझं स्वत्व नाही सोडता येत. शांतीची ती वाट तुला आता क्शी मोकळी असायची? स्वत्व राखणं ही गोष्ट फार मोठी बये,पण कायमची अशांत ठेवणारी आहे. तुझी सुटका नाही तडफडण्यातून.’

5 comments:

  1. आज व्यासपर्व वाचुन संपवले आणि सहजच त्याबद्दल गुगल केले असता तुमचा हा सुंदर ब्लॉग सापडला.
    एवढ्या सगळ्या पुस्तकांबद्दल वाचायला मजा येते.
    तुमच्या या ब्लॉग वरुन मला तुम्हाला http://www.pustakvishwa.com हे संकेतस्थळ सुचवावेसे वाटते. इथे पुस्तकांबद्दल जास्तितजास्त माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे. आपण या संकेतस्थळाला जरुर भेट द्या. शक्य असल्यास तिथेही भर घाला :-)

    ReplyDelete
  2. अप्रतिम लिहिलंय. धन्यवाद इतकया सहज विवरणासाठी

    ReplyDelete
  3. थोडक्यात पण नेमकं लिहिलंय आपण. किती वेगवेगळ्या प्रकारानी , दिशेनी व्यक्तिमत्वांचा विचार होऊ शकतो ते समजतं यातून. खूप छान सारांश लेखन. 🙏

    ReplyDelete
  4. Kiti bhari .. lekhikechi klakl apn mandlit ..ni stri jnmachi vyatha ... Nkkich vachnar he pustk

    ReplyDelete